मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस; अप्पर वैतरणात सर्वाधिक २९० मिमी पावसाची नोंद
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस; अप्पर वैतरणात सर्वाधिक २९० मिमी पावसाची नोंद
मुंबई, दि. २४ जुलै : मुंबई महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासांत समाधानकारक ते मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. दि. २३ जुलै सकाळी ६.०० ते दि. २४ जुलै सकाळी ६.०० या कालावधीत अप्पर वैतरणा धरण परिसरात सर्वाधिक २९० मिमी पाऊस झाला.
महानगरपालिकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मोडकसागर धरण परिसरात १८४ मिमी, मध्य वैतरणा येथे १७४ मिमी, तानसा धरणात १०८ मिमी, तर भातसा धरण परिसरात ७७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या या प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धरणांतील पाणीसाठ्यात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आगामी काही दिवसांतही पावसाचा जोर कायम राहिल्यास मुंबईच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने ही परिस्थिती अधिक दिलासादायक ठरण्याची शक्यता आहे.