Election news: मुंबई महानगरपालिका निवडणुकीत कोकणी मतदारांचा प्रभाव निर्णायक

0
58
२९ महानगरपालिकांच्या महापौर पदासाठी आरक्षण सोडत २२ जानेवारीला
२९ महानगरपालिकांच्या महापौर पदासाठी आरक्षण सोडत २२ जानेवारीला

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत कोकणी मतदारांचा प्रभाव निर्णायक

कोकणातील एखाद्या गावातील किंवा वाडीतील अनेक चाकरमानी मुंबईत, विशेषतः ठरावीक परिसरात वास्तव्यास असल्याचे चित्र अनेक वर्षांपासून दिसून येते. त्यामुळे मुंबईतील काही वॉर्डांमध्ये मोठ्या संख्येने कोकणातील एकाच गावाचे किंवा परिसराचे मतदार आढळतात. हे मतदार आपल्या मूळ गावाशी भावनिक नाते जपून असल्याने कोकणातील त्या गावातील स्थानिक कार्यकर्त्यांचा प्रभाव मुंबईत राहणाऱ्या मतदारांवर स्पष्टपणे जाणवतो. ही बाब लक्षात घेऊन विविध राजकीय पक्षांनी कोकणातील गावपातळीवरील कार्यकर्त्यांना थेट मुंबईत प्रचारासाठी बोलावण्यास सुरुवात केली आहे.
कोकणातील जवळपास प्रत्येक कुटुंबातील किमान एक सदस्य मुंबईत वास्तव्यास असून तेथे व्यवसाय, नोकरी अथवा उद्योगाच्या माध्यमातून स्थिरावलेला आहे. गेल्या अनेक दशकांपासून मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात कोकणातील, विशेषतः रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुपुत्र मोठ्या संख्येने नगरसेवक म्हणून निवडून येत आहेत. मुंबईतील मराठी भाषिकांचा टक्का कमी होत असल्याची चर्चा असली तरी महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी करणाऱ्या कोकणी सुपुत्रांची संख्या मात्र आजही लक्षणीय असल्याचे दिसून येते.
सद्याच्या निवडणुकीतही मुंबई व ठाणे महानगरपालिकेच्या रणांगणात कोकणातील अनेक सुपुत्र विविध पक्षांकडून उमेदवार म्हणून उतरले होते. आपल्या गावातील, वाडीतील किंवा ओळखीच्या घरातील उमेदवार विजयी होणार का, याची उत्सुकता कोकणवासीयांसह मुंबईत राहणाऱ्या चाकरमान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे.
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल वाजलेला असतानाच, मुंबई व ठाणे महानगरपालिकांच्या निवडणूक निकालांकडे कोकणवासीयांचे विशेष लक्ष लागले आहे. लाल मातीतल्या मालवणी माणसाची उत्कंठा वाढत असून, मुंबईतील राजकीय निकालांचा प्रभाव कोकणातील राजकारणावरही पडणार असल्याची चर्चा आहे.
मुंबई आणि कोकण यांचे नाते अतूट असून अनेक कोकणातील राजकीय पक्षांचे कार्यकर्ते प्रचाराच्या निमित्ताने मुंबईत ठाण मांडून होते. याशिवाय, करिअरसाठी मुंबईत गेलेले आणि तेथे स्वतःची ओळख निर्माण केलेले अनेक कोकणचे सुपुत्र या महानगरपालिका निवडणुकांमध्ये थेट उमेदवार म्हणून मैदानात उतरले आहेत.
महत्त्वाची बाब म्हणजे मुंबई महानगरपालिकेतील तब्बल ६६ वॉर्डांमध्ये रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चाकरमान्यांचा लक्षणीय प्रभाव असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुंबईतील निवडणूक निकालांमध्ये कोकणी मतदारांचा कौल निर्णायक ठरण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here