सावंतवाडी
शहरातील सालईवाडा येथे असलेल्या नगरपालिकेच्या “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” या इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच भाजपाचे नगरसेवक प्रतिक बांदेकर व निलम नाईक यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. दवाखाना सुरू असलेली इमारत अत्यंत जीर्ण अवस्थेत असून, तेथे येणाऱ्या रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे हा दवाखाना तात्काळ अन्य सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावा, अशी ठाम मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
हा ‘आपला दवाखाना’ मिलाग्रीस चर्चसमोर असलेल्या जुन्या मुख्याधिकारी निवासस्थानाच्या इमारतीत सुरू आहे. या दवाखान्यात दररोज ५० हून अधिक रुग्ण उपचारासाठी येतात. परिसरातील नागरिकांना येथे चांगली आणि नियमित सेवा मिळत असल्यामुळे रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, इमारत जुनी व जीर्ण झाल्याने धोका निर्माण झाला असून, नुकताच जनरल वॉर्डचा स्लॅबचा मोठा भाग अचानक कोसळला.
सुदैवाने स्लॅब कोसळला त्या वेळी त्या ठिकाणी कोणीही उपस्थित नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, ही घटना गंभीर असून भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशारा स्थानिकांनी व्यक्त केला आहे.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नगरसेवक प्रतिक बांदेकर व निलम नाईक यांनी नगरपालिकेच्या बांधकाम विभागाचे अधिकारी संदीप सरडे व मनोज राऊळ यांच्यासह घटनास्थळी पाहणी केली. तसेच दवाखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्ष सांगावकर यांच्याशी चर्चा करून सद्यस्थितीची माहिती घेतली.
पाहणीदरम्यान रुग्णांची सुरक्षितता सर्वोच्च प्राधान्य असल्याचे स्पष्ट करत, सद्य इमारतीत दवाखाना सुरू ठेवणे धोकादायक असल्याचे मत नगरसेवकांनी व्यक्त केले. त्यामुळे हा दवाखाना तात्काळ सुरक्षित जागेत स्थलांतरित करण्यात यावा, तसेच रुग्णांना सोयीचे ठरेल अशा ठिकाणाचा विचार करावा, अशी सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली. यासाठी जेष्ठ नागरिक केंद्राच्या इमारतीचा पर्याय तपासण्यात यावा, असेही त्यांनी सुचविले.
दरम्यान, नगरपालिकेने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने योग्य निर्णय घ्यावा, जेणेकरून नागरिकांच्या आरोग्य सेवेत कोणताही अडथळा येणार नाही आणि संभाव्य दुर्घटना टाळता येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.