रत्नागिरीच्या विकासातील खोळींबाबत जाधवांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा
रत्नागिरी │प्रतिनिधी
शहरातील खड्डे, पाणीपुरवठा आणि स्वच्छतेचा प्रश्न, विस्कटलेली वाहतूक व्यवस्था, तरुणांसाठी रोजगाराचा अभाव आणि महिलांच्या सुरक्षिततेची चिंता यासारख्या गंभीर समस्यांवर उपाय न करता सत्ताधारी केवळ हवेतल्या घोषणा करीत आहेत, अशी टीका शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी केली. नागरिकांकडून घरपट्टी, पाणीपट्टी, शिक्षणकर, वीजबिल आणि अगदी झाड लावल्यावरही कर आकारला जातो, मग त्याच्या बदल्यात सुविधा कुठे आहेत? असा रोखठोक सवाल त्यांनी उपस्थित केला.
हे पण वाचा मुरुडमध्ये उत्साहात मतदान; सकाळी मंद गती, नंतर वाढली मतदारांची गर्दी
रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शिवानी सावंत-माने यांना समर्थन देताना जाधव यांनी शहराच्या स्थानिक अस्मितेचा मुद्दा अधोरेखित केला. “शहराला बाहेरून आलेल्या नियंत्रणावर नाचवले जाणार नाही. स्वतःच्या मातीतून उभे राहिलेले नेतृत्वच शहराचा विकास करू शकते,” असे त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात विकासाऐवजी दडपशाही, भ्रष्टाचार आणि पैशांचा दुरुपयोग वाढल्याचा आरोप करत त्यांनी मतांचे खरेदी-विक्रीचे प्रकार वाढत असल्याबद्दल संताप व्यक्त केला. “बदलाची वेळ आता आली आहे,” असे आवाहन करत त्यांनी नागरिकांना २ डिसेंबर रोजी मशाल, तुतारी, हत्ती व हात या निशाणांवर मतदान करण्याचे आवाहन केले.
सभेला उपनेते व माजी आमदार बाळ माने, माजी उपनगराध्यक्ष राजेश सावंत, विधानसभा क्षेत्र संघटक प्रमोद शेरे, तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, उमेदवार शिवानी सावंत-माने, राष्ट्रवादीचे नीलेश भोसले, बसपाचे प्रशांत पवार, तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


