रत्नागिरीतील ‘श्री नवलाई देवी भाजी मंडई’च्या नूतन इमारतीचे लोकार्पण
रत्नागिरीतील ‘श्री नवलाई देवी भाजी मंडई’च्या नूतन इमारतीचे लोकार्पण
तीन कोटी रुपये खर्चून उभारलेली आधुनिक भाजी मंडई नागरिकांच्या सेवेत; विक्रेते आणि ग्राहकांना मिळणार सुविधा
रत्नागिरी :
रत्नागिरी शहराच्या विकासात आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठत जुन्या भाजी मार्केटच्या जागी उभारण्यात आलेल्या ‘श्री नवलाई देवी भाजी मंडई’च्या नूतन इमारतीचे लोकार्पण उत्साहात पार पडले. रत्नागिरी नगरपरिषदेच्या माध्यमातून वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या या इमारतीचे लोकार्पण संबंधित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रकल्पासाठी तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. विरेंद्र कन्स्ट्रक्शन यांच्या माध्यमातून इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. स्टिल्ट फ्लोअर, तळमजला आणि पहिला मजला अशा स्वरूपात उभारण्यात आलेली ही इमारत आधुनिक सोयी-सुविधांनी सुसज्ज आहे.
नवीन भाजी मंडईमुळे गाळेधारक विक्रेत्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. तसेच नागरिकांनाही भाजीपाला खरेदीसाठी स्वच्छ, नीटनेटकी आणि सोयीस्कर जागा मिळणार आहे. या प्रकल्पामुळे शहरातील भाजीपाला विक्री व्यवस्थेला अधिक चांगले स्वरूप प्राप्त होण्यास मदत होणार आहे.
या उत्कृष्ट वास्तूची उभारणी केल्याबद्दल विरेंद्र कन्स्ट्रक्शन यांचे कौतुक करण्यात आले. तसेच कार्यक्रमाचे सुयोग्य आयोजन केल्याबद्दल रत्नागिरी नगरपरिषदेतील पदाधिकारी, सहकारी आणि कर्मचारी यांचेही अभिनंदन करण्यात आले.
या लोकार्पण सोहळ्याला नगराध्यक्ष शिल्पाताई सुर्वे, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, माजी नगराध्यक्ष तथा जिल्हाप्रमुख राहुल पाटील, बंड्याशेठ साळवी, शहरप्रमुख विपिन बंदरकर, तालुकाप्रमुख बापू म्हाप, ज्येष्ठ नगरसेवक राजन शेट्ये, स्थानिक नगरसेवक विजय खेडेकर, नगरसेविका सायली पाटील, नगरसेवक अभि दुडे, पाणी सभापती निमेश नायर, ज्येष्ठ पत्रकार किशोर मोरे आणि नगरपरिषदेचे मुख्याधिकारी योगेश गारवे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला ग्रामस्थांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
रत्नागिरी शहराच्या विकासाला गती देतानाच नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. शहराच्या प्रगतीसाठी आणि नागरिकांच्या सोयीसाठी अशा विकासाभिमुख उपक्रमांना सातत्याने प्राधान्य दिले जाणार असल्याचेही सांगण्यात आले.