रत्नागिरीत राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये एकाच दिवसात ४,३२६ प्रकरणांचा सामोपचाराने निपटारा
रत्नागिरी:
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण National Legal Services Authority आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण (मुंबई) (Maharashtra State Legal Services Authority यांच्या निर्देशानुसार रत्नागिरी जिल्हा न्यायालयात (Ratnagiri District Court) तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या लोकअदालतीमध्ये प्रलंबित आणि वादपूर्व अशा एकूण ४,३२६ प्रकरणांचा सामोपचाराने यशस्वी निपटारा करण्यात आला.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष विनोद वाय. जाधव (Vinod Y. Jadhav ) यांच्या मार्गदर्शनाखाली ही लोकअदालत पार पडली. विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. आर. पाटील यांनी या मोहिमेच्या यशाची माहिती दिली.
लोकअदालतीत जिल्ह्यातील न्यायालयांमधील प्रलंबित आणि दाखलपूर्व अशी हजारो प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी ३,८७२ प्रलंबित प्रकरणांमधून १५२ प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली. तर १५,३४० वाद दाखलपूर्व प्रकरणांपैकी तब्बल ४,१७४ प्रकरणांमध्ये सामोपचाराने तोडगा काढण्यात आला.
या लोकअदालतीत दिवाणी दावे, तडजोडपात्र फौजदारी खटले, धनादेश (Cheque Bounce) प्रकरणे, वैवाहिक वाद, बँका व पतसंस्थांची वसुली प्रकरणे तसेच थकीत वीज व टेलिफोन बिलासंदर्भातील वाद अशा विविध प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.
लोकअदालतीच्या यशासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी, तालुका विधी सेवा समित्यांचे न्यायाधीश, विधीज्ञ आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. सामोपचाराने वाद मिटल्यामुळे पक्षकारांचा वेळ आणि पैसा वाचला असून न्यायालयीन कामकाजावरील ताण कमी होण्यास मदत झाली आहे.


