राजर्षी शाहू व्याख्यानमाला व पुरस्कार सोहळ्यास करवीरवासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड
राजर्षी शाहू व्याख्यानमाला व पुरस्कार सोहळ्यास करवीरवासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड
कोल्हापूर : राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही राजर्षी शाहू महाराज यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात येणार आहे. त्यानिमित्त २१ ते २५ जून या कालावधीत राजर्षी शाहू व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असून २६ जून रोजी प्रतिष्ठेचा ‘राजर्षी शाहू पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे.
यावर्षीचा राजर्षी शाहू पुरस्कार ज्येष्ठ इतिहास संशोधक स्व. डॉ. जयसिंगराव पवार (Dr. Jaysingrao Pawar) यांना मरणोत्तर प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार २६ जून २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित विशेष समारंभात प्रदान केला जाणार आहे. पुरस्कार वितरण सोहळा खासदार शाहू छत्रपती महाराज (Shahu Chhatrapati Maharaj) यांच्या हस्ते होणार असून सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar ) हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत.
राजर्षी शाहू महाराजांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि प्रगतिशील विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने व्याख्यानमाला आणि पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. व्याख्यानमालेत विविध क्षेत्रांतील मान्यवर वक्ते मार्गदर्शन करणार असून समाजप्रबोधन आणि विचारमंथनाची संधी उपलब्ध होणार आहे.
सर्व करवीरवासीयांनी या व्याख्यानमालेसह पुरस्कार वितरण सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. विजय राठोड (Dr. Vijay Rathod) यांनी केले आहे.