रायगड जिल्हा परिषदेकडून माध्यमांशी संवादासाठी अधिकृत पदाधिकारी व अधिकाऱ्यांची नियुक्ती
रायगड जिल्हा परिषदेकडून माध्यमांशी संवादासाठी अधिकृत पदाधिकारी व अधिकाऱ्यांची नियुक्ती
अलिबाग :
जिल्हा परिषद रायगडच्या विविध योजना, प्रकल्प आणि ग्रामविकासाशी संबंधित उपक्रमांची माहिती जनसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावी तसेच माध्यमांशी अधिकृत संवाद सुसंगत पद्धतीने व्हावा यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांची अधिकृत नियुक्ती केली आहे. याबाबतची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी गुरुवारी (ता. ३०) दिली.
रायगड जिल्हा परिषद ग्रामविकासासाठी सातत्याने विविध योजना आणि विकासकामे राबवत असून त्यांची अचूक व परिपूर्ण माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. शासनाच्या पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाच्या धोरणानुसार ग्रामस्थ व प्रशासन यांच्यातील संवाद अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
सध्या जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता असून, शासनाच्या विविध योजनांची माहिती वेळेवर आणि अधिकृतपणे प्रसारित करण्यासाठी तीन लोकप्रतिनिधी आणि दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना माध्यमांशी संवाद साधण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.
यामध्ये जिल्हा परिषद उपाध्यक्ष मधुकर पाटील, शिक्षण व अर्थ समिती सभापती चंद्रकांत कळंबे, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती वैकुंठ पाटील यांचा पदाधिकारी प्रतिनिधी म्हणून समावेश आहे. तसेच प्रशासनाच्या वतीने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत विभाग) विशाल तनपुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्तीमुळे जिल्हा परिषदेच्या विकासकामांबाबतची माहिती अधिक वेगाने, पारदर्शकपणे आणि अधिकृत स्वरूपात जनतेपर्यंत पोहोचण्यास मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.