मुंबई
महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामार्फत “वाटचाल वन विभागाची : संकल्प २०२९” हा दूरदर्शी आणि विकासाभिमुख आराखडा तयार करण्यात आला आहे. वनसंवर्धन, जैवविविधता संरक्षण, कांदळवन पुनरुज्जीवन तसेच शाश्वत पर्यावरण व्यवस्थापनासाठी हा आराखडा महत्त्वपूर्ण मार्गदर्शक दस्ताऐवज ठरणार आहे.
राज्यातील वनसंपदेचे संवर्धन, पर्यावरणीय संतुलन राखणे, वनक्षेत्राचा दर्जा उंचावणे आणि नैसर्गिक संसाधनांचे शाश्वत व्यवस्थापन करण्यासाठी या आराखड्यात विविध उद्दिष्टे आणि कृती आराखडे निश्चित करण्यात आले आहेत.
जैवविविधतेचे संरक्षण, हवामान बदलाच्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी उपाययोजना, कांदळवनांचे पुनरुज्जीवन, वन्यजीव संरक्षण आणि लोकसहभागातून पर्यावरण संवर्धन यावर विशेष भर देण्यात आला आहे.
वन विभागाने नागरिकांना ‘संकल्प २०२९’ विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला QR कोड स्कॅन करण्याचे आवाहन केले आहे. या माध्यमातून नागरिकांना आराखड्याची उद्दिष्टे, प्राधान्यक्रम आणि भविष्यातील पर्यावरणीय उपक्रमांची सविस्तर माहिती मिळू शकणार आहे.