नैसर्गिक शेती, मत्स्यसंवर्धन व मृदा व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन
खालापूर, रायगड : शेतकऱ्यांना आधुनिक व शाश्वत शेती तंत्रज्ञानाची माहिती मिळावी या उद्देशाने १० जून रोजी मौजे वावोशी येथे कृषी विज्ञान केंद्र, किल्ला रोहा (रायगड) आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय, खालापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
आत्मा योजनेअंतर्गत खतांचा संतुलित वापर, एल-निनो परिस्थिती आणि ‘खेत बचाओ’ अभियानाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या कार्यक्रमात ICAR-CIFT चे शास्त्रज्ञ डॉ. अभय शर्मा यांनी मत्स्यसंवर्धन, CIFT विकसित मायक्रो बूस्ट तंत्रज्ञान तसेच मत्स्य प्रक्रिया उत्पादनांबाबत शेतकऱ्यांना सविस्तर माहिती दिली.
कृषी विज्ञान केंद्राचे विषय तज्ज्ञ डॉ. जीवन आरेकर यांनी नैसर्गिक शेती, दशपर्णी अर्क, बीजामृत, जीवामृत आणि धनजीवामृत यांचे महत्त्व सांगून सेंद्रिय शेतीच्या विविध पद्धतींचे मार्गदर्शन केले. तर मत्स्य विषय तज्ज्ञ माधव गीते यांनी मत्स्यपालन आणि मत्स्य प्रक्रिया उद्योगातील संधींवर प्रकाश टाकला.
यावेळी मृदा तज्ज्ञ डॉ. सचिन कार्ले यांनी मातीचे नमुने घेण्याची पद्धत, जमीन आरोग्य पत्रिकेचे वाचन आणि जमिनीतील उपयुक्त सूक्ष्मजीवांची संख्या वाढविण्याबाबत माहिती दिली. उप कृषी अधिकारी सुरेश उघडा यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती उपस्थित शेतकऱ्यांना दिली.
कार्यक्रमास मंडळ कृषी अधिकारी नाजीम मुलानी, सहाय्यक कृषी अधिकारी शेटे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. कृषी सखी दर्शना पवार आणि दर्शना शेलार यांनी शेतकऱ्यांच्या सहभागासाठी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाचे नियोजन आत्मा बीटीएम प्रज्ञा पाटील यांनी केले तसेच सूत्रसंचालन व आभार प्रदर्शनही केले.