वासिंदमध्ये ‘रन फॉर युनिटी’ मॅरेथॉन उत्साहात; राष्ट्रीय एकात्मतेसोबत सायबर सुरक्षा व आरोग्याचा संदेश
वासिंदमध्ये ‘रन फॉर युनिटी’ मॅरेथॉन उत्साहात; राष्ट्रीय एकात्मतेसोबत सायबर सुरक्षा व आरोग्याचा संदेश
वासिंद :
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आणि राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य साधून वासिंद पोलीस ठाणे व ठाणे ग्रामीण पोलिसांच्या पुढाकाराने आयोजित ‘रन फॉर युनिटी’ मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासोबतच सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
वासिंदमध्ये ‘रन फॉर युनिटी’ मॅरेथॉन उत्साहात; राष्ट्रीय एकात्मतेसोबत सायबर सुरक्षा व आरोग्याचा संदेश
या मॅरेथॉनमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, वासिंद येथील आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. राष्ट्रीय एकता, सामाजिक सलोखा आणि सायबर सुरक्षेचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र, वासिंद येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही सहभाग घेतला. डॉ. रुपाली शेडगे यांनी उपस्थितांना स्वच्छतेचे महत्त्व, वैयक्तिक आरोग्याची काळजी घेण्याची आवश्यकता तसेच संतुलित व पौष्टिक आहाराचे महत्त्व पटवून दिले. निरोगी जीवनशैली अंगीकारून आरोग्याची काळजी घेण्याचा संदेश त्यांनी यावेळी दिला.
राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ करण्यासोबतच सायबर सुरक्षेबाबत जागरूकता आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देणारा हा उपक्रम उत्साहात पार पडला.