वैभववाडी–कोल्हापूर रेल्वेमार्गासाठी ३२४४ कोटीं

0
42
मध्य रेल्वेच्या भरती परीक्षेत मराठीचा समावेश
मध्य रेल्वेच्या भरती परीक्षेत मराठीचा समावेश

वैभववाडी–कोल्हापूर रेल्वेमार्गासाठी ३२४४ कोटीं

सिंधुदुर्ग l प्रतिनिधी

केंद्र सरकारच्या नव्या अर्थसंकल्पातून कोकणाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून, त्यात वैभववाडी–कोल्हापूर रेल्वे मार्गासाठी ₹३२४४ कोटींची भरीव तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती मत्स्य व बंदरे विकास मंत्री तसेच सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली.

कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, या रेल्वे प्रकल्पाचा एकूण अंदाजित खर्च सुमारे ₹६५०० कोटी असून, त्यापैकी अर्धा निधी केंद्र सरकार तर उर्वरित अर्धा निधी राज्य सरकारकडून दिला जाणार आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेला हा प्रकल्प प्रत्यक्ष मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पालकमंत्री नितेश राणे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामुळे कोकणच्या आर्थिक विकासाला मोठे पाठबळ मिळाले आहे. खासदार नारायण राणे यांच्या प्रयत्नांमुळे कोकणासाठी केंद्राकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत असल्याचे यातून स्पष्ट होते.

या अर्थसंकल्पात मच्छीमार,नारळ व काजू उत्पादकांसाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. मच्छीमार व्यवसायाला चालना देण्यासाठी ५०० नव्या तलावांची निर्मिती केली जाणार असून, यामुळे किनारपट्टीवरील मच्छीमारांचे उत्पन्न वाढण्यासमदत होणार आहे. स्टार्टअप्स, महिला बचत गट तसेच मत्स्य

उत्पादक संघटनांचे जाळे अधिक मजबूत करण्यात येणार आहे. खोल समुद्रातील मासेमारीतून मिळणारा मासा करमुक्त करून निर्यातीला प्रोत्साहन दिले जाणार असल्याने या क्षेत्राला मोठा लाभ होईल.

कोकणातील फळपिकांना ‘व्हॅल्यू क्रॉप’चा दर्जा देण्यात आल्याने शेती क्षेत्राला नवे बळ मिळणार आहे. नारळ उत्पादनासाठी कोकणात मोठी संधी असून, त्यासाठी नारळ संवर्धन योजना प्रभावीपणे राबवली जाणार आहे. तसेच काजूला आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘प्रीमियम ब्रँड’ म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

वैभववाडी–कोल्हापूर रेल्वे प्रकल्पाबाबत बोलताना नितेश राणे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पातील राज्य सरकारचा ५० टक्के वाटा उचलण्याचा निर्णय घेतला आहे. भूसंपादनाची प्रक्रिया आधीच सुरू असून, निवडणुकांनंतर कामाला अधिक वेग दिला जाईल. २०२८ पर्यंत हा रेल्वे मार्ग पूर्ण करण्याचा सरकारचा मानस आहे.

बंदर विकास आणि जहाजबांधणी क्षेत्रासाठीही अर्थसंकल्पात मोठी तरतूद करण्यात आली असून, सी-प्लेन सेवा सुरू करण्याचा निर्णय कोकणातील पर्यटनासाठी महत्त्वाचा ठरेल, असेही त्यांनी नमूद केले. भविष्यात जलवाहतूक व पर्यटनाच्या माध्यमातून कोकणाचा व्यापक विकास होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

याचवेळी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बोलताना पालकमंत्री नितेश राणे यांनी अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देऊ नये, असे आवाहन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here