शहापूरच्या पाणी योजनेवर खासदार बाळ्या मामा म्हात्रे यांचा सवाल
शहापूरच्या पाणी योजनेवर खासदार बाळ्या मामा म्हात्रे यांचा सवाल
चार धरणे असताना ३५० कोटींच्या नव्या योजनेची गरज काय?
शहापूर तालुक्यातील पाणीटंचाई आणि सुरू असलेल्या जलयोजनांच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार बाळ्या मामा म्हात्रे यांनी जिल्हा परिषद ठाणे येथे झालेल्या आढावा बैठकीत संबंधित योजनेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. शहापूर परिसरात चार धरणे उपलब्ध असताना सुमारे साडेतीनशे कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना राबविण्याची आवश्यकता काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
स्थानिक धरणांमधून नियोजनबद्ध पद्धतीने पाणी उचलून कमी खर्चात नागरिकांना पाणीपुरवठा करता येऊ शकतो, मात्र व्यवहार्य पर्यायांकडे दुर्लक्ष करून मोठ्या खर्चाच्या योजना राबविल्या जात असल्याची टीका त्यांनी केली. तसेच योजनेच्या अंमलबजावणीत नियोजनाचा अभाव असल्याचा आरोप करत प्रथम पाइपलाइन टाकण्यात आली, मात्र पाणीपुरवठ्याचे ठोस नियोजनच करण्यात आले नसल्याने कोट्यवधी रुपयांचा खर्च वाया गेला असल्याचे त्यांनी नमूद केले.
या विषयावर संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत स्वतंत्र बैठक घेऊन संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. शहापूरकरांना शाश्वत आणि प्रभावी पाणीपुरवठा मिळावा, यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.