सत्तरीपार ज्येष्ठांसाठी सरकारचे ‘आरोग्यकवच’; ‘वय वंदना कार्ड’द्वारे १० लाखांपर्यंत मोफत उपचार

0
12
‘वय वंदना कार्ड’द्वारे १० लाखांपर्यंत मोफत उपचार
‘वय वंदना कार्ड’द्वारे १० लाखांपर्यंत मोफत उपचार

सत्तरीपार ज्येष्ठांसाठी सरकारचे ‘आरोग्यकवच’; ‘वय वंदना कार्ड’द्वारे १० लाखांपर्यंत मोफत उपचार

७० वर्षांवरील नागरिकांना उत्पन्नाची अट नाही; हृदयविकार, कर्करोग, किडनीसह गंभीर आजारांवर कॅशलेस उपचार

नांदेड, दि. २८ :
वाढत्या वयासोबत उद्भवणाऱ्या आरोग्य समस्यांमुळे होणारा आर्थिक भार कमी करण्यासाठी केंद्र सरकारने आयुष्मान भारत योजनेअंतर्गत ‘वय वंदना योजना’ सुरू केली आहे. या योजनेनुसार ७० वर्षे आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला उत्पन्नाची कोणतीही अट न ठेवता १० लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्यसेवेचा लाभ मिळणार आहे. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना ‘वय वंदना कार्ड’ दिले जात असून त्याद्वारे विविध गंभीर आजारांवरील उपचार पूर्णपणे कॅशलेस पद्धतीने करता येणार आहेत. सामान्य आयुष्मान भारत योजनेत एका कुटुंबाला वर्षाला ५ लाख रुपयांपर्यंतचे संरक्षण मिळते. मात्र ‘वय वंदना कार्ड’ हे त्याव्यतिरिक्त अतिरिक्त संरक्षण देणारे कवच आहे.
एका कुटुंबात दोन ज्येष्ठ नागरिक असल्यास दोघांनाही स्वतंत्रपणे ५-५ लाख रुपयांपर्यंतचा लाभ मिळू शकतो. या योजनेत हृदयाची शस्त्रक्रिया, बायपास सर्जरी, अँजिओप्लास्टी, गुडघा व सांध्यांचे प्रत्यारोपण, कर्करोग उपचार, किडनीविकार, मोतीबिंदू तसेच मेंदूशी संबंधित गंभीर आजारांचा समावेश करण्यात आला आहे. योजनेचा लाभ केवळ सरकारी रुग्णालयांपुरता मर्यादित नसून आयुष्मान भारत योजनेअंतर्गत नोंदणीकृत खाजगी रुग्णालये, जिल्हास्तरीय मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि इतर मान्यताप्राप्त आरोग्य संस्थांमध्येही उपलब्ध आहे. उपचारासाठी रुग्णालयात दाखल होताना कोणतीही रक्कम जमा करण्याची आवश्यकता नसून संपूर्ण प्रक्रिया कॅशलेस आणि पेपरलेस आहे. लाभार्थ्यांनी फक्त ‘वय वंदना कार्ड’ आणि आधार कार्ड सादर केल्यानंतर ऑनलाइन पोर्टलद्वारे उपचार प्रक्रिया सुरू केली जाते.
‘वय वंदना कार्ड’ मिळविण्यासाठी मोबाईलमध्ये ‘Ayushman App’ डाउनलोड करून ‘Beneficiary’ पर्यायामध्ये मोबाईल क्रमांक, ओटीपी, आधार क्रमांक आणि सेल्फीच्या माध्यमातून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागते. त्यानंतर ई-कार्ड डाउनलोड करता येते. तसेच हे कार्ड रुग्णालयातील आरोग्य सेवक किंवा संबंधित सुविधा केंद्रांमार्फतही उपलब्ध करून दिले जाते. आरोग्य विभागाने ७० वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना तातडीने ‘वय वंदना कार्ड’ काढून घेण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत त्यांना त्वरित आणि आर्थिक भाराशिवाय उपचारांचा लाभ घेता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here