साताऱ्याची रिया शिंदे सलग दुसऱ्यांदा राष्ट्रीय बॉक्सिंग विजेती

0
12
साताऱ्याची रिया शिंदे सलग दुसऱ्यांदा राष्ट्रीय बॉक्सिंग विजेती
साताऱ्याची रिया शिंदे सलग दुसऱ्यांदा राष्ट्रीय बॉक्सिंग विजेती

साताऱ्याची रिया शिंदे सलग दुसऱ्यांदा राष्ट्रीय बॉक्सिंग विजेती

आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

सातारा, दि. २७ :
अथक मेहनत, जिद्द आणि शिस्तीच्या बळावर सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील हुमगाव येथील रिया निलेश शिंदे हिने जालंधर येथे पार पडलेल्या ५ व्या सब-ज्युनिअर राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत ३० ते ३३ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
रियाने सलग दुसऱ्या वर्षी राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम करत सातारा जिल्ह्यातील राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेतील पहिली महिला सुवर्णपदक विजेती होण्याचा मान मिळवला आहे.
या उल्लेखनीय यशानंतर रियाची आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी भारतीय संघात थेट निवड झाली असून, आता ती जागतिक स्तरावर भारतासह सातारा जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करण्यासाठी सज्ज झाली आहे.
रियाच्या या यशामुळे जावळी खोऱ्यातील खेळाडूंमध्ये असलेली गुणवत्ता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. ग्रामीण भागातील प्रतिभावान खेळाडूंना योग्य संधी आणि प्रोत्साहन मिळाल्यास ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही चमकदार कामगिरी करू शकतात, याचे रियाने उत्तम उदाहरण घालून दिले आहे.
या अभूतपूर्व यशाबद्दल रिया शिंदे, तिचे कुटुंबीय, प्रशिक्षक सागर जगताप आणि रवींद्र होले, तसेच तिच्या यशात मोलाचे योगदान देणाऱ्या सर्वांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही रियाने भारतासाठी सुवर्णयश मिळवावे, अशा शुभेच्छा व्यक्त होत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here