सायबर जागरूकता, सुरक्षित विद्यार्थ्यांसाठी बेडेकर शाळेत जनजागृती कार्यक्रम
सायबर जागरूकता, सुरक्षित विद्यार्थ्यांसाठी बेडेकर शाळेत जनजागृती कार्यक्रम
ठाणे, दि. ६ ऑगस्ट : विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने नौपाडा पोलीस ठाण्याच्या वतीने बेडेकर शाळा येथे विद्यार्थी सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, मोबाईल व इंटरनेटच्या माध्यमातून घडणारे सायबर गुन्हे, फोटो मॉर्फिंगद्वारे होणारे गैरप्रकार तसेच अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे दुष्परिणाम याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. डिजिटल युगात सतर्क राहण्याचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना ऑनलाइन फसवणूक आणि सायबर गुन्ह्यांपासून बचावाचे उपायही समजावून सांगण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना पोलीस हेल्पलाइन क्रमांक 112 आणि सायबर हेल्पलाइन क्रमांक 1930 यांची माहिती देण्यात आली. कोणतीही संशयास्पद घटना अथवा अडचण उद्भवल्यास तात्काळ मदत घेण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी पोलीस निरीक्षक संजय दवणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत सुरक्षित आणि जबाबदार डिजिटल वापराचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमास १५ शिक्षक-शिक्षिका तसेच सुमारे ३०० ते ३५० विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करून सुरक्षित समाज घडविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम उपयुक्त ठरल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.