सावंतवाडीच्या ५७ कोटींच्या नळपाणी योजनेला वेग

0
20
सावंतवाडीच्या ५७ कोटींच्या नळपाणी योजनेला वेग
सावंतवाडीच्या ५७ कोटींच्या नळपाणी योजनेला वेग

सावंतवाडीच्या ५७ कोटींच्या नळपाणी योजनेला वेग

सावंतवाडी l प्रतिनिधी

शहरासाठी तब्बल ५७ कोटी रुपये खर्चून राबविण्यात येत असलेल्या नळपाणी योजनेचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून आतापर्यंत सुमारे २० टक्के काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती सावंतवाडी नगरपरिषदेचे पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. डोंगराळ भौगोलिक रचना आणि अरुंद रस्त्यांमुळे काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या; मात्र त्या तातडीने दूर करण्याच्या सक्त सूचना संबंधित ठेकेदाराला देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नगरपालिकेत आयोजित पत्रकार परिषदेत समिती सदस्य नीलम नाईक आणि सुकन्या टोपले उपस्थित होत्या. पाणीपुरवठा सभापती पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर श्री. बांदेकर यांनी पाळणेकोंड धरणावर सुरू असलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेतला. आमदार दीपक केसरकर यांच्या प्रयत्नांतून २०२३ साली या योजनेस मंजुरी मिळाली होती.

मूळ नियोजनानुसार हे काम २०२६ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र विविध तांत्रिक अडचणी आणि आवश्यक शासकीय परवानग्यांमुळे कामाचा वेग मंदावला असून सध्या केवळ २० टक्के काम पूर्ण झाले आहे. रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, कोलगाव व केसरी ग्रामपंचायत यांच्याकडून आवश्यक परवानग्या घेण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

या योजनेच्या पहिल्या टप्प्याचे काम २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून, दुसऱ्या टप्प्यात शहराला २४ तास अखंड पाणीपुरवठा देण्याचा मानस आहे. दरम्यान, नागरिकांना गैरसोय होऊ नये यासाठी पावसाळ्यापूर्वी खडीकरणाची कामे पूर्ण करण्यात येणार असल्याचेही श्री. बांदेकर यांनी नमूद केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here