सावंतवाडी, दि. १५ : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील प्रसूती विभागाच्या प्रवेशद्वाराजवळ साप आढळल्याने रुग्ण, नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर रुग्णालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते गुरुदास गवंडे यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रसूती विभागाच्या प्रवेशद्वाराजवळ साप दिसून आल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. रुग्णांच्या नातेवाईकांनी तत्काळ याबाबत रुग्णालय प्रशासनाला माहिती दिली.
या घटनेनंतर मनसेचे गुरुदास गवंडे यांनी रुग्णालय परिसरातील स्वच्छता आणि सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित केले. प्रसूती विभागासारख्या संवेदनशील ठिकाणी साप आढळणे ही गंभीर बाब असून रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले.
गवंडे यांनी रुग्णालयातील काही रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याचाही आरोप केला. तसेच रुग्णालय परिसरातील वाढलेली झाडेझुडपे, स्वच्छतेचा अभाव आणि सुरक्षेच्या उपाययोजनांतील त्रुटी याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, या घटनेमुळे रुग्णालयातील सुरक्षाव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. परिसरातील झाडाझुडपांची साफसफाई, सर्पप्रतिबंधक उपाययोजना आणि रुग्णांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती खबरदारी तातडीने घेण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
या प्रकरणी रुग्णालय प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.