सावंतवाडी उपविभागीय कार्यालयाच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन; ४.३३ कोटींचा निधी मंजूर

0
69
सावंतवाडी उपविभागीय कार्यालयाच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन; ४.३३ कोटींचा निधी मंजूर
सावंतवाडी उपविभागीय कार्यालयाच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन; ४.३३ कोटींचा निधी मंजूर

सावंतवाडी उपविभागीय कार्यालयाच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन; ४.३३ कोटींचा निधी मंजूर

सावंतवाडी | प्रतिनिधी

सावंतवाडी येथील उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाच्या नवीन, भव्य आणि सुसज्ज इमारतीचे भूमिपूजन पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. सावंतवाडी उपविभागातील प्रशासन आणि नागरिकांसाठी हा दिवस ऐतिहासिक असल्याचे मत पालकमंत्री नितेश राणे यांनी यावेळी व्यक्त केले.

कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री राणे म्हणाले की, या उपविभागीय कार्यालयाची इमारत सावंतवाडी उपविभागातील प्रत्येक नागरिकासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. प्रशासन अधिक सक्षम, गतिमान आणि लोकाभिमुख होण्यासाठी आधुनिक पायाभूत सुविधांची नितांत गरज असून, त्या दिशेने टाकलेले हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या इमारतीसाठी महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी ४ कोटी ३३ लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल त्यांनी त्यांचे विशेष आभार मानले.

ही इमारत ठरवलेल्या कालावधीत पूर्ण होणे अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट करताना पालकमंत्री नितेश राणे म्हणाले की, दोन वर्षांच्या ऐवजी जर एका वर्षातच काम पूर्ण झाले, तर संबंधित यंत्रणेचा विशेष सत्कार करण्यात येईल. दर्जेदार आणि वेळेत पूर्ण होणारी विकासकामे हीच प्रशासनाची ओळख असली पाहिजे, असेही त्यांनी ठामपणे नमूद केले.

नवीन इमारतीतून प्रशासन अधिक पारदर्शक, जलदगती आणि लोकाभिमुख झाले पाहिजे, असे सांगत पालकमंत्री म्हणाले की, नागरिकांना कामासाठी कमीत कमी चकरा माराव्या लागतील, अशा पद्धतीने प्रशासनाचे कामकाज व्हावे. नागरिकांशी आपुलकीने वागणे, त्यांच्या कामांना प्राधान्य देणे आणि तक्रारींची शक्यता निर्माण होऊ न देणे, हे प्रशासनाचे कर्तव्य असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

विकासकामे आणि विविध शासकीय प्रकल्प वेळेत पूर्ण झाल्यास जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल, असे नमूद करत पालकमंत्री राणे म्हणाले की, सावंतवाडी, वेंगुर्ला आणि दोडामार्ग हे तीनही तालुके विकासाची मोठी क्षमता असलेले आहेत. या उपविभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे.

यावेळी आमदार दीपक केसरकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, नवीन उपविभागीय कार्यालयाची इमारत अत्यंत सुसज्ज स्वरूपाची असणार असून, या माध्यमातून नागरिकांना अधिकाधिक शासकीय सेवा पारदर्शक आणि कार्यक्षम पद्धतीने मिळणार आहेत. पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्याची विकासाकडे घोडदौड सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाची प्रस्तावना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केली. त्या म्हणाल्या की, सन १९१० साली बांधण्यात आलेली जुनी उपविभागीय कार्यालयाची इमारत आता कालबाह्य झाली असून, वाढत्या लोकसंख्येच्या आणि नागरिकांच्या गरजांच्या पार्श्वभूमीवर नवीन, आधुनिक इमारतीची आवश्यकता होती. ही नवीन इमारत भविष्यात नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे आभार उपविभागीय अधिकारी सचिन घारे यांनी मानले. नवीन इमारतीच्या माध्यमातून स्वच्छ, पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभार केला जाईल. नागरिकांना कमी वेळेत अधिक सेवा देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

या भूमिपूजन कार्यक्रमास आमदार दीपक केसरकर, सावंतवाडी नगराध्यक्ष श्रीमती श्रद्धा राजे भोसले, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, उपविभागीय अधिकारी सचिन घारे, उपसंचालक जमाबंदी आयुक्त कार्यालयाचे हेमंत निकम, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील, वेंगुर्ला तहसीलदार ओंकार ओतारी, युवराज लक्ष्मणराजे भोसले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here