सुनेत्रा पवार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर निर्माण झालेल्या शोकाकुल वातावरणात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने महत्त्वाचा निर्णय घेत सुनेत्रा अजित पवार यांची राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री व महाराष्ट्राच्या ११व्या आणि पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत.
बारामती येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. या धक्कादायक घटनेनंतर सावरत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने पक्ष आणि सरकारच्या भविष्यासाठी निर्णायक पाऊल उचलले आहे. अजित दादांच्या पत्नी सुनेत्रा अजित पवार यांची महाराष्ट्र विधिमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली असून, आज त्यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्या महाराष्ट्राच्या ११ व्या आणि पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत.
राज्यावर ओढवलेल्या दुःखद वातावरणामुळे कोणताही गाजावाजा न करता, लोकभवन येथे अतिशय साधे-पणाने शपथविधी सोहळा पार पडला. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा. प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे, मंत्री, आमदार व निवडक मान्यवर या वेळी उपस्थित होते..
अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी आणि पक्षाची विखुरलेली संघटना सावरण्याची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्यावर सोपवण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ची विधानभवन येथे पार पडलेल्या बैठकीत, खा. प्रफुल्ल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत व खा. सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली, सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. तसेच विधिमंडळ पक्षासंदर्भातील सर्व निर्णय घेण्याचे अधिकारही त्यांना देण्यात आले.
हे ठराव छगन भुजबळ यांनी सूचक म्हणून मांडले, तर दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ यांच्यासह वरिष्ठ नेत्यांनी त्यास अनुमोदन दिले. त्यानंतर प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेऊन ठरावांचे पत्र दिले.


