सैन्य दलात अधिकारी होण्याची संधी; मोफत SSB पूर्व प्रशिक्षणासाठी १२ ऑक्टोबरला कोल्हापुरात मुलाखत
कोल्हापूर :
भारतीय सैन्यदल, नौदल आणि वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी इच्छुक पात्र उमेदवारांसाठी महाराष्ट्र शासनातर्फे सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (SSB) परीक्षेच्या पूर्वतयारीचे मोफत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती १२ ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे घेण्यात येणार आहेत.
महाराष्ट्रातील नवयुवक व युवतींसाठी SSB कोर्स क्रमांक ६७ अंतर्गत हे प्रशिक्षण १९ ते २८ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे आयोजित करण्यात आले आहे. प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणासोबतच निवास आणि भोजनाची सुविधा नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
मुलाखतीस उपस्थित राहताना उमेदवारांनी Department of Sainik Welfare, Pune (DSW) यांच्या संकेतस्थळावरून SSB-67 कोर्सचे प्रवेशपत्र डाउनलोड करून त्याची प्रिंट सोबत आणावी. संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून प्रवेशपत्राची प्रिंट मिळाल्यास तीही स्वीकारली जाईल. प्रवेशपत्रासोबतची आवश्यक परिशिष्टे पूर्ण भरून सोबत आणणे आवश्यक आहे.
SSB प्रशिक्षणासाठी उमेदवारांकडे खालीलपैकी किमान एक पात्रता असणे आवश्यक आहे. Combined Defence Services Examination (CDS) किंवा National Defence Academy Examination (NDA) उत्तीर्ण होऊन SSB मुलाखतीसाठी पात्र ठरलेले उमेदवार, तसेच NCC ‘C’ प्रमाणपत्र A किंवा B ग्रेडमध्ये उत्तीर्ण असून NCC Group Headquarters कडून SSB साठी शिफारस झालेले उमेदवार पात्र असतील.
याशिवाय SSB मुलाखतीसाठी कॉल लेटर असलेले उमेदवार, Technical Graduate Course साठी SSB मुलाखतीचे कॉल लेटर असलेले उमेदवार तसेच विद्यापीठ प्रवेश प्रणालीअंतर्गत SSB मुलाखतीसाठी कॉल लेटर असलेले किंवा SSB साठी शिफारस केलेल्या यादीत नाव असलेले उमेदवारही पात्र राहतील. संबंधित पात्रतेचे प्रशिक्षण प्रमाणपत्र मुलाखतीस व प्रशिक्षणास येताना सोबत आणणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथील प्रभारी अधिकाऱ्यांशी [email protected], दूरध्वनी 0253-2451032 किंवा WhatsApp क्रमांक 9156073306 वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर यांच्यामार्फत करण्यात आले आहे.


