हेटवणे-नवी मुंबई जलवाहिनी प्रकल्पामुळे १३० घरांना तडे; ग्रामस्थांच्या मागण्यांवर भरतशेठ गोगावले यांची बैठक
हेटवणे-नवी मुंबई जलवाहिनी प्रकल्पामुळे १३० घरांना तडे; ग्रामस्थांच्या मागण्यांवर भरतशेठ गोगावले यांची बैठक
पेण :
पेण तालुक्यातील जिते ग्रामपंचायत हद्दीत सुरू असलेल्या हेटवणे-नवी मुंबई जलवाहिनी प्रकल्पाच्या जलबोगदा उत्खननादरम्यान करण्यात येणाऱ्या स्फोटांमुळे १३० हून अधिक घरांना तडे गेल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या आहेत. तसेच स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध करून देणे आणि ग्रामपंचायतीचा कर भरणे या मागण्यांसाठी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त बैठक घेण्यात आली.
या बैठकीला संबंधित विभागांचे अधिकारी, सिडकोचे अधिकारी आणि कंत्राटदार कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांच्या विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. ग्रामस्थांच्या रास्त मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
विकासाचे प्रकल्प राबविताना सामान्य ग्रामस्थांचे तसेच आदिवासी वाडी-पाड्यांतील नागरिकांचे नुकसान होता कामा नये, ही आपली ठाम भूमिका असल्याचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी यावेळी स्पष्ट केले. या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून अंतिम तोडगा काढण्यासाठी सिडकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत लवकरच सिडको कार्यालयात पुढील बैठक घेण्यात येणार आहे.
या बैठकीस आमदार महेंद्रशेठ दळवी, रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे, अपर जिल्हाधिकारी सचिन ढोले, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, पेण प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार, सिडकोचे अधिकारी, कंत्राटदार कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच जिते, मुंगोशी, बेलवडे आणि परिसरातील आदिवासी वाडी-पाड्यांतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.