२९ जुलै रोजी वरवेली येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान’

0
13
‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान’
‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान’

२९ जुलै रोजी वरवेली येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान’

विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी

गुहागर, दि. २३ :
महसूल व वन विभागाच्या वतीने ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान’ अंतर्गत बुधवार, २९ जुलै २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत श्री पूजा सेवा मंगल कार्यालय, वरवेली (ता. गुहागर) येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर गुहागर विधानसभा मतदारसंघातील गुहागर, खेड आणि चिपळूण तालुक्यातील नागरिकांसाठी आयोजित करण्यात आले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर राबविण्यात येणाऱ्या विशेष अभियानाचा हा एक भाग आहे. महसूल व वन विभागाच्या ९ जुलै २०२६ च्या शासन निर्णयानुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघात अशा शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.
या शिबिरामध्ये महसूल, कृषी, पंचायत समिती, नगर पंचायत, भूमी अभिलेख, आरोग्य, ग्रामीण रुग्णालय, एकात्मिक बाल विकास सेवा योजना (ICDS), वन विभाग, नोंदणी व मुद्रांक विभाग, सहकारी संस्था, उमेद अभियान, कामगार विभाग, पोलीस विभाग, मत्स्यव्यवसाय, महावितरण, पशुसंवर्धन, बांधकाम कामगार विभाग आदी विविध शासकीय विभागांच्या योजनांची माहिती, विविध दाखल्यांचे वितरण, ॲग्रीस्टॅक (शेतकरी नोंदणी), आरोग्य तपासणी तसेच इतर नागरिकाभिमुख सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
गावागावातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि शेतमजुरांना महसूल व इतर शासकीय सेवांचा लाभ एकाच ठिकाणी, पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने मिळावा, हा या शिबिराचा प्रमुख उद्देश आहे.
प्रशासनाने गुहागर, खेड आणि चिपळूण तालुक्यातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here