३५० विद्यार्थ्यांच्या स्वरांजलीतून गुरु तेग बहादूर साहिबजींना भावपूर्ण अभिवादन
नांदेड : हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षाचे औचित्य साधून पवित्र तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब, नांदेड येथे भव्य आणि विशेष कीर्तन समागमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे ३५० शालेय विद्यार्थ्यांनी एकाच सुरात सादर केलेले श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या शब्द गुरबानीचे सामूहिक गायन, ज्याने उपस्थित संगतांना मंत्रमुग्ध केले.
पवित्र तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने आयोजित या कीर्तन समागमात विद्यार्थ्यांनी भक्तिभावाने गुरबानीचे गायन करत गुरु तेग बहादूर साहिबजींच्या बलिदानाला अनोखी स्वरांजली अर्पण केली. शिस्तबद्ध सादरीकरण, स्वरांची एकरूपता आणि आध्यात्मिक वातावरणामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता.
या कार्यक्रमास तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब गुरुद्वाराचे जत्थेदार संत बाबा कुलवंत सिंघजी, गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंघ (से.नि. भा.प्र.से.), हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी ३५० वा शहीदी समागम राज्यस्तरीय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक, जसवंत सिंग बॉबी, तसेच गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक हरजीत सिंघ जी कडेवाले आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांनी आपल्या मनोगतातून गुरु तेग बहादूर साहिबजींच्या त्याग, धर्मस्वातंत्र्य आणि मानवतेसाठी दिलेल्या बलिदानाचे स्मरण करून, तरुण पिढीने या मूल्यांचे पालन करावे, असे आवाहन केले.


