८ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्गात मेगा मेडिकल स्पेशालिटी आरोग्य तपासणी शिबिर
८ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्गात मेगा मेडिकल स्पेशालिटी आरोग्य तपासणी शिबिर
पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून विविध तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी; आयुष्मान भारत व महात्मा फुले योजनांचीही सुविधा
सिंधुदुर्ग :
पालकमंत्री Nitesh Rane यांच्या संकल्पनेतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय तसेच एकत्रित प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना यांच्या संयुक्त विद्यमाने मेगा मेडिकल स्पेशालिटी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर शनिवार, ८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी ३.०० या वेळेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग येथील बाह्यरुग्ण विभागात आयोजित करण्यात आले असून, अशी माहिती महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अनंत डवंगे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
या शिबिरात विविध आजारांवरील तज्ज्ञ डॉक्टर नागरिकांची तपासणी करणार आहेत. यामध्ये कार्डिओलॉजिस्ट, कार्डियाक सर्जन, न्युरोसर्जन, प्लास्टिक सर्जन, ऑन्को सर्जन (कॅन्सरतज्ज्ञ), युरोसर्जन, जनरल सर्जन, अस्थिरोग तज्ज्ञ, नेत्ररोग तज्ज्ञ, दंतचिकित्सक, हृदयरोग व मधुमेहरोग तज्ज्ञ, फुफ्फुसरोग तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ आणि स्त्रीरोग तज्ज्ञांचा समावेश आहे.
याशिवाय रक्तदाब, रक्तातील साखर, एक्स-रे, सीटी स्कॅन, सोनोग्राफी, हृदयाची 2D इको तपासणी, ईसीजी, प्रयोगशाळा रक्त तपासणी तसेच शालेय मुलींची आरोग्य तपासणी अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
शिबिरस्थळी महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना, आयुष्मान भारत कार्ड, वयवंदना कार्ड आणि आभा (ABHA) कार्ड नोंदणी व मार्गदर्शन सुविधाही उपलब्ध राहणार आहेत.
जिल्ह्यातील नागरिकांनी या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.